मिळावी मनःशांती म्हणून

 

मिळावी मनःशांती वा व्हावी आत्मोन्नती

म्हणून का तुम्ही लागून लांब लांब लाईनीत,

पडून आजारी, करून आबाळ स्वतःची

संत, महात्मे, पीर, फकिराचे उंबरठे झिजवता

 

होऊन ध्यानस्त, झाकून माळेस हातात जपून बोटाने,

जोरजोराने पढून पोथ्यापुराणे सारून बाजूला इतरांना लपून एकटे,

बांधून डोक्याला रुमाल वा अन्य कुठला रंगबिरंगी कपडा

वा गळ्यात लटकवून नामस्मरणाचे मोठमोठे दुपट्टे

घालून बोटात मोठमोठ्या रंगबिरंगी अंगठ्या

ठेवून कपटी भावना, तुम्हास ही न कळे तुम्ही कुणास भजता

का होऊन वेडे असे बेताल वागता

 

का चढून उंच अवघड अशा जीवघेण्या डोंगरावर, पर्वतावर

वा कंटीकाकर्ण, विषारी निशाचर असलेल्या मार्गाने चालून

का घेता कुठल्या मूर्तीचे वा पुतळ्याचे दर्शन

त्यापरीस जाऊन अशा खेड्यास दया भेट

ज्या ठिकाणी नाही कुठली ही पाऊल वाट

वा ज्या लोकांची अजून पडली नाही

शिक्षणाशी वा सुखसमृध्दीशी गाठ

 

का पाजता विषारी सापांना दूध

का अग्नीत टाकून चांगले तूप देता आहुती

त्यापरीस, ज्यांना दोन वेळेस खाण्यास मिळत नाही

वा ज्यांना कधी सणावारांना गोडधोड माहित नाही

त्यांना इतक्याच उत्साहाने खाऊ घालून

करून एका नव्या माणुसकीच्या सणाची निर्मिती

चालू करा एक चांगली रीती

 

सर्व धर्मग्रंथ सांगतात देव परोपकारात आहे,

प्राणीमात्रावर दया करा

तर बापराजे हो, नुसती शोबाजी करून,

माणुसकीला काळिमा फासून,

आपल्याच सारख्या माणसांना तुडवून,

त्यांचे हाल करून, त्यांना वंचित ठेवून

देव, धर्म, पीर, फकीर यांना भिऊन

खरच कुठली मनःशांती वा आत्मोन्नती तुम्ही याल घेऊन