साई मंदिरात गेलो असता तिथे गुरुपौर्णिमेनिमित्त आकर्षक रोषणाई केली होती
विविधरंगी फुगे फुगवून भिंतींना चिकटविली होती
चायनीज छत्र्यांची लायटिंग छतावर टांगली होती
ते पाहून KG तला मुलगा आपल्या आईला म्हणाला
“आई ख्रिसमस आहे म्हणून मंदिर सजविले आहे का” ?
ते ऐकताच मी कुतूहलाने त्या मुलाकडे पाहिल
“गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे म्हणून मंदिर सजविले आहे”
असे त्याची आई त्याला सांगत होती
पण ते काही त्या लहानग्या चिमुकल्याला समजत नव्हत
मी विचार केला, लहान मुल ज्या गोष्टी जास्त बघतात त्याच गोष्टी स्मरणात ठेवतात
तो मुलगा मिशनरी शाळेत जातो म्हणून
त्याला मंदिरातली रोषणाई ख्रिसमस सारखी वाटली
खरच मुल निरागस असतात
पण आपण त्यांना बालपणापासून
जात, धर्म, द्वेष शिकवीत असतो
अरे जी मुल मंदिरात येऊन ख्रिसमस आहे म्हणून रोषणाई केली का विचारतात
किंवा चर्चमध्ये गेल्यावर तिथली घंटा पाहून हे कोणत्या देवाचे मंदिर आहे म्हणून विचारतात
खरच त्यांना जात, धर्म हा प्रकार अवगत असेल का ?
म्हणून मित्र हो मंदिर–मस्जिद किंवा अन्य धर्मक्षेत्री मुलांना नेण्याऐवजी
त्यांना ऐतिहासिक स्थळावर घेऊन जा
व आपल्या देशाचा तेजस्वी इतिहास समजावून सांगत जा
बालवयापासून त्यांना शुभंकरोती वा अन्य कुठलीही स्तोत्रे वाचावयास देण्याऐवजी
विज्ञानाची, अभ्यासाची पुस्तके वाचण्याची आवड लावा,
देवीदेवतांची चित्रे दाखविण्याऐवजी
आधुनिक विमाने, कारखाने,मोठमोठी धरणे यांची तसबिरे दाखवा
म्हणजे ते धर्मांध बनण्याऐवजी डॉक्टर, इंजिनिअर, वैज्ञानिक बनून
आहे त्याही पेक्षा आधुनिक अस काही निर्माण करून,
चांगला मानवोपयोगी शोध लावून
धरतीवासियांचे जीवन सुकर करून जवाबदार नागरिक बनतील