लाखोंचा पोशिंदा

भगवंता तू खरा आहे लाखोंचा पोशिंदा

केवळ मुखी वदता नाव तुझे

होवून प्रसन्न देशी भक्ता

जो जे वांछिल ते ते मुक़्तहस्ता

तुझ्या नावावर चालती कित्येकांचे उदरनिर्वाह

कुणी बांधती हॉटेल अन धर्मशाळा

अन कुणी आणती दळणवळणाची साधने

तर कुणी फूल अन प्रसादाची मांडून दुकाने

बसविति आपली बस्ताने

तर कुणी बळेच फकिराच सोंग घेऊन

कमविति पैसे मुखी आवळून तुझे नाव

तर कुणी अगतिक, असहाय असल्याचा आणती आव

धर्माचे ठेकेदार ही

जणू आपणच देवाच्या संपत्तीचे मालक समजून

करिशी स्वतःचा बडेजाव

तर कुणी वेडा बनून आळविती

तुझी स्तुतीसुमने काढून जोरजोराने आवाज

तर कुणी अंगात टोचून शस्त्रे बनती हुनरबाज

कुणी रंगवून थोबडे

घेती तुझे रुपडे

तर कुणी भर उन्हात राहून एका पायावर उभे

वा लावून समाधी अधांतरी

पैसे कमविण्या करीती जादुगरी

 

तुझ्या नावात खरेच आहे बळ

घेता तुझे नाव सर्वकाही मिळते फुकात

काही न सोसता कळ

खरोखरच तू आहे निर्मळ

न ठेवता मनी कुठली ही खूणगाठ

बळेच का होईना पण घेता तुझे नाव

तू देशी मुकाट

खरच भगवंता तू लाखोंचा पोशिंदा

तुझा महिमा अफाट