वाटते अस बनाव

 

वाटते अस बनाव

की काही चांगल करून

नाव किर्तीरूपे उराव

अन युगे न युगे फुलांच्या सुगंधागत सदैव स्मराव

 

वाटते व्हाव बाल श्रीकृष्णागत

बोबडे बोल बोलत ठुमकत ठुमकत चालाव,

गोपिकांचे मटकी गोटे मारत फोडाव,

लडिवाळ चाळे करून सर्वांस आपल कराव

आपल्यातील उणिवांवर मात करून

काही भव्य दिव्य करून धारण करून विराट अवतार

समाजातील कंस अन कालियांचे मर्दन कराव

 

वाटते घ्यावी हनुमंतासारखी झेप

शोधण्यास अंतराळापलीकडील ग्रह अन तारे

फुलवून तेथे शेती अन मळे

अन आणून धरतीवर तेथील संपदा अन खनिजे

स्वागत करावे अवघ्या दुनियेचे

बसवून हृदयात तयांना

दाखवावी छाती फाडून

आहे किती ममता आमुच्याअंगी धरतीवासियांना

 

वाटते व्हाव शिवशंकरासारखे

येवोत किती ही संकटे

न घाबरता बसावे निश्चल

आनंदाने डमरू वाजवत, तांडव करीत,

समाजातील कुप्रथांचे, अंधश्रध्दांचे प्यावे हलाहल

पाहता समाजातील अबलांचे हाल

उघडून त्रिनेत्र, घेऊन मोहिनीचे रूप,

भस्मासुरांना त्यांच्याच हाताने करावे राख

 

वाटते व्हावे पांडवांचे अक्षयपात्र

समाजातल्या रंजल्या गांजल्या लोकांना

देऊन दोन घास खाऊ घालावे पोटभर नीट

येताच त्यांच्या अंगी बळ

लढतील ते अंतरीच्या अन बाहेरच्या शत्रूसंगे

असोत ते क्रूर वा किती ही धीट

 

वाटते व्हावे प्रभू श्रीरामासारखे

पाळावे दिलेले वचन,

करून हातून सत्कर्मे

आपण समाजाचे काही देणे लागतो हे उमजून

समाजासाठी काही करून

निवडून दिलेल्या लोकनेत्यांस लाजिरवाणे करून

शिकवावे तयास शहाणपण

 

वाटते व्हावे सुदाम्याच्या पोहयासारखे अन शबरीच्या बोरासारखे

असो अपुली किती ही गरीब परिस्थिती

न बाळगता लाज तयाची

करावा समोरच्याचा आदर सत्कार

तो असो किती ही रुबाबदार

फेकून लाजेचे, गरिबीचे शुक्लकाष्ट,

आणून मुखी हास्य, हर्षोल्लासाने अन सोडून अहंकार

 

वाटते व्हावे पांडुरंगाच्या पायाखालची विट

आपले सगेसोयरे वागोत आपल्याशी कसे ही

पण विसरून ते सारे उणेदुणे

सदैव मुखी वसो स्मित

व्हावे सगळ्यांचे चांगले हे चिंतीत

पदरी पडत अपमान अन शिव्याश्राप

न बाळगता तमा तयांची

बेडी पडता जवाबदाऱ्यांची पायात

जगावे सगळ्यांचे गोडवे गात

 

 

वाटते व्हावे सावित्रीबाई फुलेंच्या पाटीसारख

जिणे स्वतः जास्त शिक्षित नसतांना

इतरांना शिक्षित केले

आपल्या पडक्या वाड्यात शाळा सुरु करून

महिलांसाठी व दुर्लक्षित जनांसाठी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली

व महिलांच्या माथ्यावर लिहिलेला अबलाशब्द खोडून

त्यांना प्रत्येक क्षेत्रात आगेकूच करण्यास शिकवून

सबलाअशी ओळख करून दिली

 

 

वाटते व्हावे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे

ज्यांनी अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करून

उच्च डिग्र्यांची आपल्या नावामागे रांग लावली

दुर्लक्षित, उपेक्षित समाजासाठी उभे आयुष्य वेचून

पवित्र ग्रंथ भारताचे संविधानलिहून

स्वातंत्र्य, समता अन बंधुभावाची शिकवण दिली

व साऱ्या जगातून जातीभेद, वंशभेद व प्रांतभेद मिटवून

नवीन जीवन जगण्यास प्रेरणा दिली

 

 

वाटते व्हावे मदर टेरेसा सारखे

ज्या माऊलीने हा आपला तो परका भेद पाळला नाही

परदेशात येऊन त्या देशाच्या भाषेची ओळख नसतांना

स्वतःच्या आरोग्याची तमा न बाळगता

आजारी, कुष्ठरोगी यांची ममतेने सुश्रुषा करून

गरीब, पददलित यांना ममतेने स्वहस्ते दोन घास भरवून

ज्या देशाचे मीठ खाल्ले त्या देशाला आपले मानून

आपल्यातील प्रखर राष्ट्रीयतेचा परिचय देवून

धन्य झाली ती वीरमाता तिन्ही जगाची मदरहोऊन

 

वाटते व्हावे असेच काही तरी

घेऊन प्रेरणा यांच्या पासून

तशाच जीवनाला आहे काही अर्थ

अन्यथा सारे काही व्यर्थ

जरी झालो नाही यांच्या सारख

पण कुणा एका गरीब, गरजू वा आजाऱ्याला

देऊन मदतीचा हात केले पायावर उभे

तर समजावे झाले सार्थक आपले जिणे