वाटते मोठी खंत

आचार्य कणाद, आर्यभट्ट यांसारख्या विद्वानांच्या देशात

पाहता चोहीकडे वाटते मोठी खंत

पाश्चिमात्य देशात दररोज धुंडाळली जातात अंतराळे,

शोधली जातात नवनवी ग्रहे आणि उपग्रहे

मोजली जाते त्यांची पृथ्वी पासून दूरी अन गती

शोधली जाते आहे का मानववस्तीसाठी वातावरण,

मानवोपयोगी खनिजे व ती आणण्याची साधने

विज्ञानाद्वारे होईल कसे जीवन मानवाचे सुकर

यांचा सर्वोपरी विचार असतात करीत प्रगत राष्ट्रे

 

आम्ही भारतीय मात्र त्या शोधलेल्या ग्रहांना

मांडून कुंडलीत, बसवून वक्री वा सरळ गतीत,

विसरून स्वतःस भविष्यकाराच्या भ्रामक गोष्टीत,

घालुनी बोटात अंगठी बसवून त्या ग्रहाचा खडा

ओढत असतो स्वतःवरच अज्ञानाचा ओरखडा

प्रगत विज्ञानाने केली भविष्यकारांची पितळे उघडी

उलगडून ग्रहताऱ्यांची गुपिते

तरी ही मात्र जेव्हा लागतो मानव यांच्या नादी

होऊनि वेदना मनी फार खुपते