विचित्र माणूस

 

माणूस ही मोठा विचित्र आहे

सर्वपित्री अमावस्येला मायबापाच्या तसबिरीसमोर

सोवळओवळ नेसून देवा ब्राम्हणांच्या साक्षीने

हवन पूजा करून, दूध, दही माखून

चांगल्या तांदळाचा भोग खाऊ घालतो कावळ्याला

झाडाखाली उभा राहून वाट पाहतो चातकासारखी त्याची

पण जिवंतपणी त्यांना एकट सोडून, भुकेन तडपवून

अद्दल घडवितो जन्माची

 

याची भूतदया ही वेगळीच आहे

देवी देवतांना सणावारांना मोठ्या उत्साहाने कपडेलत्ते घेतो

अन मायबापाच्या नावान पावत्या फाडून दान ही देतो

तेच मायबाप जिवंत असतांना त्यांच्याकडे पाहून तोंड वाकड करतो

अन दिवस उगवल्याबरोबर त्यांच्या मरणाची कामना करतो

 

याला नसते कोणाची काळजी

जेव्हा सांगावी खबर आपल्या अत्यंत प्रियजनाच्या मरणाची

तेव्हा तो दोन अश्रृ ढाळण्याऐवजी

फक्त उच्चारतो दोनच शब्द केव्हा नेणार आहे

अन प्रॉपर्टीसाठी भांडण करून

कमवल काही नाही, भांडण लावून गेलेम्हणून

मेलेल्या मायबापालाच शिव्या देतो

 

जेव्हा होते नौकरीत बढती

किंवा तैय्यारी नव्या गृहप्रवेशाची

वा अन्य कुठल्याही शुभ समयी

इष्टमित्र, आप्तस्वकीयांना बोलावून

हा तिथे देतो त्यांना पंचपक्वान्नाची पार्टी

त्यांच्या संगे तेथे करे धांगडधिंगा अन मस्ती

वाया घालवी फेकून कचऱ्यावर अन्न उष्टी

परंतु त्या समयी येता कोणी याचक दारावर

त्यास न देता अन्नाचा एक ही कण

हाकलून देई सुनावून दहा गोष्टी

 

घरी हा करतो पडलीसडली कामे

खाल मानेन ऐकतो बायकोची ताने

ती जे सांगेल ते तो करतो मुकाट्याने

पण मात्र येता बाहेर, न जाणो त्यास होते काय

संचारतो अंगात राक्षस

अन लांघून साऱ्या माणुसकीच्या मर्यादा

खेकसून अंगावर कित्येकांच्या, वाहून शिव्यांची लाखोळी

घरच्या रागाचे खापर फोडतो, बाहेरच्या लोकांच्या मस्तकावर

 

खरच माणूस मोठा विचित्र आहे

त्याची करणी अन कथनी अतर्क्य आहे