मी मित्राला सहज म्हंटले चाललो मी गणपतीच्या दर्शनाला
तोच तो उत्तरला कोणत्या गणपतीला
दगडूशेठ गणपतीला ? चिंतामणीला ? कि अष्टविनायकाला ?
ते ऐकताच काय उत्तर दयावे हे न कळले मला
खरोखरच समाजात फारच विचित्र परिस्थिती आहे
जर कोणी म्हणतो मी दर्ग्यात दर्शनाला गेलो होतो
तर दुसरा पटकन म्हणतो कोणत्या अजमेरच्या ? कि चरार–ए–शरीफच्या ?
कोणी म्हणतो मी चर्चमध्ये प्रेअरला गेलो होतो
तर पटकन तिसरा विचारतो कोणत्या व्हॅटकिन सिटीच्या? कि सेंट पिटर्सबर्गच्या ?
बर त्या धर्मस्थळाची महती सांगून ही ते मोकळे होतात
ते सांगतात अमुक पिठात शंकराचार्यांचा वास होता,
अमुक दर्ग्यात फलान्या फकिराचा निवास होता
तर कोण्या चर्चमध्ये मदर टेरेसांना संतपदाचा बहुमान प्राप्त झाला होता
अहो तो देवच, ते कुठे ही राहोत, त्यांचा आकार कसा ही असो
स्वरूपच त्यांचे भिन्न आहे,
तुम्ही कुठल्याही ठिकाणी असलेल्या धर्मस्थळी जा
सगळ्यांवर समान कृपादृष्टी त्याची राहे
आपण मात्र चारचाकी गाड्यांच्या मॉडेल सारख देवीदेवतांनाही,
ते एक असतांनाही, त्यांचे विविध मॉडेलमध्ये मेक बनविले आहे
इकॉनॉमी मॉडेल ते टॉप मॉडेल असे भेद केले आहे
प्रसिद्ध वा जगप्रसिद्ध राम, रहीम वा गॉड असतात टॉप मॉडेल
कारण साऱ्या जगातून त्यांच्याकडे लोक येऊन
गर्दी करत असतात, त्यांना भजत असतात, मुक्त्तहस्ताने दान देत असतात
अन इकॉनॉमी मॉडेल म्हणजे आपल्या गल्ली बोळातल्या
मंदिर, मस्जिदी, गिरिजाघरी वसत असलेले
भक्तांच्या हाकेला धावून येणारे तेच परमात्मे
परंतु कोणी न जाई त्यांच्याकडे ते स्लममध्ये राहत असल्याने
त्यांना दान दक्षिणा मिळत नसल्याने
मित्र हो, भाव नसेल मनी तर कुठल्याच धर्मस्थळी जाऊ नका
पण असा तुसडेपणा करून त्या विधात्याला हिणवू नका