श्रीमंतीचे चोचले

 

हातात लॅपटॉप, महागडा मोबाईल, दिवाणखान्यात मोठा T.V.

पुरवून श्रीमंतीचे चोचले, घरात लक्ष्मी खेळे,

पण आपल्या देशाच्या भल्यासाठी, आपल्या चांगल्यासाठी

त्यावर काय पाहिजे पाहिले हे न कळे

कोणत्या देशाने कोणता शोध लावला,

कोणत्या शास्त्रज्ञाने नवीन जीवरक्षक औषध शोधले,

हया बातम्या पाहण्या न धजे अपुले डोळे

हे सर्व सोडून, कानात हेडफोन लावून

त्यावर ऐकण्या देवधर्माची गाणी,

वेगवेगळ्या धर्माच्या सत्संगाची वाणी मन वळवळे

 

भव्य वास्तू, त्यात महागड्या वस्तू, दारावर डोअरबेल

पण दरवाज्यावर असते कोरले आपल्या धर्माच्या देवाचे नाव,

छतावर आपल्या धर्माचा झेंडा,

घरात स्पीकरवर मंत्रपुष्पांजली वा आपल्या देवाचे नामस्मरण

आळवतांना ऐकू येई कोणी गायक बंदा,

दक्षिण दिशेला कुठल्या तरी देवाची मूर्ती ठेवलेली दिसे,

डोअरबेल वाजविताच, वाजून आरती, लाफिंग बुद्धा हसे

 

घरी कोणी येताच घरचे यजमान त्याला अहंपणे सांगती

आपण मानत असलेल्या देवाची, संताची, पीराची महती

दोनचार पुस्तके त्या संतांची, देऊन पाहुण्यास वाचा म्हणती

सत्संगाच्या, पारायणाच्या तारखा आपल्यास न चुकता माहित असती

अन दानदक्षिणा करून तेथून आलेला व्हॉट्सऍप लोकांस दाखवत बसती

 

क्षणोक्षणी देव बदलणारी भक्ती आपली

चॅनल बदलला आपल्या मनातला देव बदलतो

लहान लेकरू सांगत असलेल कीर्तन ही टाळ्या वाजवत ऐकतो

मिक्सर, ग्राइंडर, ओव्हन अत्याधुनिक वस्तू केवळ आपल्या घरात

दारावर लिंबामिरच्याच तोरण, घोड्याची नाल, शनीची उलटी बाहुली

या उपायानेच होत असते चांगल हेच असते उरात