टी. व्ही. वर चॅनल बदलता बदलता पडली एका सत्संगावर नजर
त्यात एक धर्मगुरू किडनी स्टोन झालेल्या,
निर्जीव होऊन निपचित खाली पडलेल्या एका स्त्रीच्या पोटावर हात फिरवून
जोरजोरात आपल्या देवाचे नाव घेऊन
“दर्द तू निकल जा“, “दर्द तू निकल जा” म्हणत ओरडत होता
धर्ममार्तंडाने तसे करता करताच काही वेळाने ती स्त्री
अंगात वीज चमकावी तशी उठून बसली व ताडताड चालू लागली
तोच समोर बसलेले लोक तिला चालतांना पाहताच
जोरजोरात टाळी वाजवू लागले, आश्चर्य व्यक्त करू लागले
मग धर्मगुरूंनी तिला कवटाळून पोटाशी लावले व म्हणाले
“पहा बर बेटा, प्रभूच नाव घेताच झाली ना व्याधी दूर“
ती स्त्री ही हसून “हो” म्हणू लागली व देवाचे आभार मानू लागली
दुसऱ्या चॅनलवर एक बाबा आपल्या अंगावरील कंबल
एका अपंग माणसाच्या अंगावर टाकून, त्याचे पाय ओढून
कंबल काढून घेताच ती उठून चालू लागलेली दिसायची
तर कुठे कुठल्या मजारीवर एक डगलेवाला बाबा
अंगात येऊन तडफडत असलेल्या बायांच्या मस्तकावर लिंबू कापताच
त्या शांत होताच सामान्य होऊन वागू लागल्याचे पहायला मिळायची
नवल वाटल, वाटल यांच्यापुढे तर विज्ञान ही फेल आहे,
डॉक्टरांच्या डिग्ऱ्या अन त्यांच शिक्षण थोतांड आहे
डॉक्टर ही प्लास्टर बांधून, सलाईन लावून, काही दिवस आपल्या दवाखान्यात ठेवून
रुग्णाला बरे करतो, किडनी स्टोन असता ऑपरेशन करून काढतो
त्यास ही रुग्णास बरे करण्यास वेळ लागतो,
पण हे भगवे, हिरवे, पांढरे दाढीवाले साधू–पीराच सोंग घेतलेले लुटेरे
रुपयाची देवाच्या नावाची पावती फाडून, क्षणात रुग्णास करती बरे
आता टी.व्ही., मोबाईल मनोरंजनाच साधन राहीलच नाही
त्यात अंधश्रद्धा पसरविणाऱ्या कार्यक्रमाचीच भरमार राही
आपण ही अशा साधू, पीर, फकिरांचे चमत्कार पाहून थक्क होतो
व तेथे आपली व्याधी नेऊन फसगत करून घेतो
अरे हे लोक तर असतात बिझनेसमन, धर्माच्या आड देवाच नाव घेऊन
नौटंकी करणाऱ्या कलाकारांना पैसे देऊन,
त्यांच्याकडून आजारी असण्याच नाटक करून घेऊन
उपस्थित लोकांसमोर आपली कला सादर करण्यास सांगतात
ते ही आजारी असण्याच नाटक करून, आपली कला सादर करून,
या साधू, पीर, फकीरांच्या हस्तेच दुरुस्त झाल्याचे दाखवितात
पण, कळत नाही आपल्याला हा धूर्त लोकांचा पैसे कमविण्याचा मार्ग
पटकन होण्या व्याधी दूर, शिकाऱ्याच्या जाळात अडकून होतो जायबंद