काल T.V. वर, महाराष्ट्रातील काही गावांतील स्त्रिया
साजरा करीत असलेला ‘गौराई” उत्सव पाहिला
त्यात त्या गावातील साऱ्या समाजाच्या, जाती–धर्माच्या स्त्रिया
मनोभावे “गौराई” उत्सव साजरा करितांना दिसल्या,
मन भरून आले,
कोण म्हणतो हो आपल्या देशात जातीद्वेष आहे
“आम्ही सारे मानव आहोत” हे त्या गावातील साऱ्या समाजाच्या स्त्रियांनी
तो उत्सव एकत्र मनवून दर्शविले
चंद्रयान–३ च्या सॉफ्ट लँडिंगसाठी
वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या धुरिणांनी देवळात महापूजा केली
अन मुस्लिम बांधवांनी मस्जिदमध्ये Mission यशस्वी व्हावे म्हणून
विशेष नमाज अदा केली
पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडला म्हणून
कोणी बेडकाला काठीला बांधून
“धोंडी, धोंडी पाणी दे” म्हणत वरुणराजाला याचना केली
तर कोणी खुल्या मैदानात, निरभ्र आकाशाखाली,
“सब के खेत–खलियानो मे पानी बरसने दे” म्हणत
हजारोंच्या संख्येने जमून अल्लाला विनंती केली
कोणी हिंदू बांधव ‘रमजान‘ मध्ये रोजे ठेवतो
तर कुणी मुस्लिम बांधव आपल्या मशिदीमध्ये
‘गणपती उत्सव‘ साजरा करतो
हिंदूंचे सणवार मुस्लिमांना तोंडपाठ असतात
तर मुस्लिमांचे त्योहार हिंदूंच्या “सर आँखों पर” असतात
हे सर्वसामान्य लोक जरी सर्वसामान्य असले
तरी खरे समाजोद्धारक आहेत
साष्टांग नमन करतो मी या समाजसुधारकांना
जे एकजुटीचा परिचय देऊन समाजात गुण्यागोविंदाने नांदतात
धिक्कार करतो त्या समाजविघातक शक्तिंचा
जे जाती–धर्मात भांडणे लावतात