पृथ्वीवरून विविध देशांची त्यांच्या ग्रहावर येत असलेली याने पाहून
सारी ग्रह तारे हादरली
आता मानवीदशा आपल्याला पिडेल या विचाराने चुळबुळू लागली
अन पृथ्वीवर अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ,
तर कधी अल –निनो सारखे वादळ आणून
मानवावर संकटे आणू लागली
त्यांच्या ग्रहावर मानवाने धाडलेले उपग्रह येताच
ती निकामी करू लागली
परंतु मानव आपले उपग्रह अजून प्रगत करून
त्यांच्या ग्रहावर soft landing करू लागल्याने
ती कोमात जाऊ लागली
चांद्रयानाचा रोव्हर “विक्रम” छाती काढून मुक्त्त संचार करू लागला
हे पाहून धडकी भरून, ग्रहणाधिस्त होऊन,
चंद्राची सुतकी अवस्था होऊ लागली
तर शनीची, आपण मानवाला आपल्या साडेसातीचा भरपूर प्रसाद दिला
परंतु तो प्रभाव ओसरू लागल्याने आपल्यावर यान धाडून
आता मानव आपल्याला सळो–की–पळो करून सोडणार
या भीतीने गाळण उडू लागली,
घाबरून लाल होऊन, आता आपलीच दशा मानव आपल्याला लावेल
या विचाराने हैराण होऊन, अंगातले सारे अवसान गाळून
मानवाच्या Mars Mission कडे हतबल होऊन मंगळाची दृष्टी लागली,
वरुण अन नेपच्युन ढगाआड लपू लागली
तर सूर्याने Aditya L-1 या सूर्य मोहिमेचा धसका घेत
आपली दाहकता कमी केली
आता आपली खैर नाही हे पाहून सारी ग्रह मंडळी काळजीने काळवंडली
अन मानवी दशेचे निवारण करण्यासाठी आपापल्या कुंडल्या दाखवून
होमहवन, नारायण नागबळी किंवा करण्या काळी जादू
भेटतो काय ब्रम्हांडात कुणी पंडित याचा शोध घेऊ लागली